You Are Here: Home » Body Treatment » कशाने का मरेना, जरा सन्मानाने मरू दयाल श्रीदेवीला?

कशाने का मरेना, जरा सन्मानाने मरू दयाल श्रीदेवीला?

श्रीदेवी ही माइया काॅलेजच्या जीवनातील मनावर कायमचा ठसा ठेवून गेलेली अभिनेत्री. तिच्या अकाली मृत्यूने तिचे कुटूंबिय व चाहते दुःखातून अजून सावरत नाहीत, तोपर्यंतच समाजमाध्यमांतवर तिचा मृत्यू का झाला याबद्दलच्या विकृत तर्काचे मोहोळ उठले. त्यामध्ये या गुणी अभिनेत्रीच्या गुणाचे मूल्यामापन करणारे व आठवणीचे कढ काढणारे लेखन अक्षरश: वाहून गेले. व्हाटसअॅप विद्यापीठातल्या पदवीधरांनी वजन कमी करणे, सौंदर्य उपचार कसे घातक आहेत, व नैसर्गिक जीवनशैली कशी चांगली यावर प्रवचने सुरू केली. सौंदर्योपचारामुळे हदयक्रिया बंद पडली असे तोडलेले तारे मुठीत असेपर्यंत श्रीदेवीचा मृत्यू दारू पिल्यामुळे झाला असावा असा ‘कहानी में व्टीट्ट’ आला. आता दारू पिणे कसे हानीकारक आहे व प्यायचीच तर ती स्वदेशी व शास्रोक्त कशी प्यावी यावर पोस्टींचा पूर आला नाही तरच नवल.
श्रीदेवीचा चाहता व सौंदर्यशास्त्रात तज्ञ म्हणुन या समाज माध्यमाच्या वाहयात चर्चेला उत्तर देण्याची मला इच्छा झाली. या विषयाला पहिल्यांदा तोंड फोडले ते पियाली गांगुली या गायिकेने. तीने तिच्या थोबाड पुस्तकाच्या भिंतीवर लिहिले ‘‘तिचे इम्प्लाॅट, वजन घटवणे व नियमित बोटाॅक्स घेणे यामुळेच तिची हृदयक्रिया बंद पडली असावी’’ मी त्वचारोगतज्ञ असल्याने हे विधान किती अडाणीपणाचे आहे हे मला तर कळाले पण बरेचजण त्यात वाहवत गेले. सौन्दर्योपचार व बोटाॅक्स फिलर इंजेक्शन हे दुर्देवाने लोकप्रिय होण्यापेक्षा गाॅसिपलाच जास्त बळी पडले. सौंदर्यउपचार व सौंदर्य तारका याबद्दल चांगल्यापेक्षा वाईटच बोलायला लोकांना जास्त आवडते. याचा एकेका मुद्दयावर परामर्श घेऊ. सुंदर तरूण व बारीक दिसणे ही माणसाची नैसर्गिक उर्मी आहे. त्यासाठी घरगुती वा वैद्यकिय प्रयत्न करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक आवडनिवड असेल. त्याचा आपण आदर करणार की आपली मते इतरांवर लादणार? मी चेहऱ्यावर मेकअप लावणार की नाही इतके ते वैयक्तिक आहे. सुंदर दिसण्याचे हे प्रयत्न सुरक्षित आहेत का आधुनिक वैद्यकीय बहुतांश उपचार हे सुरक्षित व अन्न औषध प्रशासनाने (FDA) प्रमाणित केलेले असतात शिवाय उपचार करणारे त्वचारोगतज्ञ व प्लास्टीक सर्जन हे उच्च बुध्दीमत्ता व अनुभवाच्या गटात मोडतात. (त्या शिवाय या पैसेवाल्या तारका आपला चेहरा कसा त्यांच्या हाती सोपवतील?) बोटाॅक्स हा उपचार सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरतात व ज्या प्रमाणात ते वापरले जाते त्यामुळे हृदयक्रिया बंद पडणे हे केवळ अशक्य आहे. प्लास्टीक सर्जरीमध्ये स्तनांचा आकार वाढवण्यासाठी इंप्लान्ट वापरतात त्यांना अॅलर्जी येणे हे वीस वर्षांपूर्वी शक्य होते सध्या वापरले जाणारे स्तन, नाक शस्त्रक्रियेतील इम्प्लाॅंट अत्यंत सुरक्षीत असतात.अगदीच कमी दर्जाचे इंप्लान्ट वापरले तर झालीच तर अॅलर्जी होईल. हृदयक्रिया बंद पडणार नाही. आता वजन कमी करण्याबद्दल. अन्न वर्ज्य करून किंवा ओकाऱ्या काढून वजन कमी करणे हे आरोग्य दृष्ट्या अयोग्यच. सर्वच तारेतारका आजकाल व्यायाम व आहाराबद्दल खूपच जागरूक असतात. श्रीदेवी पूर्वीपण व अलीकडे पण झिरो फिगरच्या मागे असल्याचे ऐकिवात नाही. अशा अपु-या ज्ञानावर आधारीत काॅमेंटमुळे प्रभावी सुरक्षित व नाविन्यपूर्व अशा सौंदर्याेपचार शाखेबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतात. वैद्यकीय सौंदर्योपचारामुळे झालेल्या दुष्परिणामांपेक्षा शेकडो पट अधिक चेहरे घरगुती उपचाराने खराब झालेले आहेत. वैद्यकिय उपचारांच्या परिणाम व दुष्परिणामांबाबत गैरसमज नको म्हणुन हा लेखन प्रपंच ही लेखिका पुढे लिहीते ‘‘चाळीशी, साठीच्या स्त्रियांना सुध्दा तरूण व बारीक दिसण्याचे सामाजिक दडपण असते. म्हणुन या बायका अशा शस्त्रक्रिया व सौंदर्योपचाराच्या मागे जातात. किमान तिच्या नवर्याने तरी तिला रोखायला नको का? श्रीदेवीला स्वतःच्या सुंदर दिसण्याबद्दल न्यूनगंड होता. ती तिच्या मुलींना या भयंकर न्यूनगंडाचा वारसा देणार का?” ही सरळसरळ चिखलफेक झाली. स्वतःच्या मनातल्या कल्पनांसाठी श्रीदेवीचा नवरा व मुली यांच्या भावना दुखावणारं हे वाक्य. तरुण, सुंदर व बारीक दिसण्याचं दडपण हा या व्यवसाया चा भाग नाही का? प्रत्येक व्यवसायात या ना त्या प्रकारचीं दडपणं असतातच की! श्रीदेवीच्या अभिनयाचा समृध्द वारसा नजरेआड करून अघोरी सौंदर्यांपचार करण्याचा वारसा तीने मागे सोडला असं म्हणणं म्हणजे केवढी तर्कदुष्टता. आज दुस-या दिवशी ती दारू पिउन आंघोळीच्या टब मध्ये बुडली असं वृत्त आल्यावर ही मंडली आणखी काय तारे तोडतील याची कल्पनाही करवत नाही. (नंतर टब मध्ये झोपून दाखवून टब मध्ये कसं मरणं शक्य आहे वा नाही अशी सर्कस दाखवणारे अँकर पाहता ही भीती सार्थच होती).
यापेक्षाही मोठा मूर्खपणा मोठया इंग्रजी दैनिकाच्या उपसंपादकाने दाखवला. या विनीता नंगिया हीने तर हद्दच केली. ‘‘बोनी कपूरची पहिली बायको तिच्या मुलाच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मेली व दुसरी बायको श्रीदेवी तिच्या मुलीच्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मरते हयात विचित्र योगायोग वाटत नाही का? तया पहिल्या बायकोचा हा शाप असेल का?’’ ही उपसंपादिका म्हणते मी श्रीदेवीला चित्रपटात बसून पाहणाऱ्या लाखो चाहत्यांपैकी एक आहे म्हणजे हीचा वैयक्तीक परिचय नाही, कौटुम्बिक जवळीक
नाही. तरी ही या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाबद्दल न बोलता वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक करणा-या या पीत पत्रकारितेबद्दल काय बोलावे?

शेवटी माझा प्रश्न हा आहे की आपलं आयुष्य कसं जगावं हे ठरवण्याचा श्रीदेवीला हक्क आहे की नाही? तीने ठेवलेला अभिनयाचा वारसा तिच्या मुलीलाच नव्हे तर संपूर्ण देशाला समृध्द करणारा आहे. सेलेब्रिटी असणं कीती वेदनादायक
असतं नाही? अख्खं आयुष्य लोकांच्या नजरेत जगावं लागतं आणि मरणे सुध्दा सार्वजनिकच. माझा प्रश्न एवढाच की कशाने का मेली असेना, जरा सन्मानाने मरू दयाल बिचाऱ्या श्रीदेवीला?

डॉ नितीन ढेपे,( लेखक त्वचारोगतज्ञ सौन्दर्यतज्ञ व डॉक्टर मला सुंदर दिसायचंय या पुस्तकाचे लेखक आहेत).

About The Author

Skin Specialist in Pune

Dr Niteen Dhepe is a Board Certified Dermatologist and has developed himself as a pioneer in field of Cosmetic Dermatology and Lasers in India. He is the biggest entrepreneur in contemporary dermatology world of India.

Number of Entries : 276

Copyright © 2017 SkinCity. All rights reserved.

Scroll to top